विद्यालयीन खेळातूनच उत्तम खेळाडू घडतात : तटकरे

| कोलाड | वार्ताहर |

भविष्यातील उत्तम खेळाडू हे विद्यार्थीदशेत तयार होत असतात, त्यामुळे शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे शैक्षणिक संस्थेचे कर्तव्य आहे. विद्यालयात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आपली संस्था सदैव आग्रही असते असं सांगून संदीप तटकरे यांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहित केले. कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळ कोलाडच्या श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरसगाव या विद्यालयात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीप तटकरे व्यासपीठावरून बोलत होते.

विद्यालयात पावसाळी क्रीडा स्पर्धा अंतर्गत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे शुक्रवार, दि. 8 व शनिवार, दि. 9 सप्टेंबर अनुक्रमे मुले व मुली असे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून रोहा गटशिक्षणाधिकारी सौ. धायगुडे यांच्यासह संस्थेचे सचिव प्रकाश सरकले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील, प्रणय इंगळे, एमडीएम फ्युचर स्कूलच्या मुख्याध्यापिका योगिनी देशमुख आणि क्रीडा समन्वयक श्री. काणेकर यांची उपस्थिती होती.

या पावसाळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातून तब्बल 64 संघ सहभागी झाले होते. यामध्ये 19 व 14 वर्ष वयोगटात के.ई.एस. मेहेंदळे रोहा या विद्यालयाचे संघ विजयी झाले असून, 17 वर्षे वयोगटात श्रमिक विद्यालय चिल्हे या विद्यालयाचा संघ विजयी झाला आहे. विजयी संघाची निवड जिल्हा क्रीडा स्पर्धेत झाली असून, सर्व विजेत्यांवर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील क्रीडा प्रमुख श्री. मेंढे व श्री. महाले यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थीवर्गाने मेहनत घेतली.

Exit mobile version