विद्यार्थ्यांना ताप आणि उलट्यांचा त्रास
। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषद शाळेत वाटप करण्यात आलेल्या बिस्किटातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली असून विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शाळेत दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमधून विषबाधा होण्याचे प्रकार वाढत आहेत. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवार असल्याने बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मात्र, बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागले, काहींना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागला तर अनेक विद्यार्थ्यांना अचानक ताप आला. जवळपास 50 विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. ही बाब लक्षात येताच सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.