ज्ञानमंदिर शाळेमध्ये दप्तर विना शाळा

| पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील ज्ञानमंदिर शाळेमध्ये दप्तर विना शाळा या उपक्रमाच्या निमित्ताने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध सामाजिक नागरिकांना संदेश देण्यात आले.आजची लहान मुले हेच उद्याचे भारतीय भविष्य आहे. आपला स्वार्थ काहीसा बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याची जाणीव त्यांना विद्यार्थी दशेतच करून दिल्यास उद्याचे नागरिक हे सक्षम व बांधिलकी जपणारे नक्कीच होतील. या उद्देशाने कळंबोली येथील ज्ञानमंदिर शाळेकडून शालेय पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर अनेक उपक्रम राबवले जातात.

इयत्ता 1 4 थी च्या चिमुकल्यांनी यामध्ये सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम घरोघरी जाऊन जनजागृती करणारे पत्रके वाटली. त्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये स्वतः बनविलेले पोस्टर्स हातात घेऊन पर्यावरण विषयक जनजागृती केली. त्याचबरोबर वीज व पाणी बचत, प्लॅस्टिक निर्मूलन, जंगल संवर्धन वन्यप्राणी व पक्षी संवर्धन, हवा व ध्वनी प्रदूषण याविषयी खर्‍या अर्थाने केले. या बालवयात चिमुकल्या विद्यार्थ्यांना समाज व पर्यावरणबाबत सजग करण्याचा एक छोटासा पण सुंदर उपक्रम शाळेने राबविला. या रॅलीमध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजना बाईत यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली. या उपक्रमाला आनंद भिशीकर, डॉ गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version