शाळा महाविद्यालये गुटख्याच्या विळख्यात

| पेण | संतोष पाटील |

राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असली तरी प्रत्यक्षात ती कागदावरच असल्याचे पहायला मिळते. पेण शहर आणि तालुक्यातील सर्वच शाळा-महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर पानटपऱ्यांमधून सर्रास प्रतिबंधित गुटख्याची विक्री होतानाचे चित्र दृष्टीस पडते आहे नियमानुसार 500 मिटरच्या आत कोणत्याही प्रकारची पानटपरी अथवा प्रतिबंधक पदार्थ विक्रीसाठी असणाऱ्या टपऱ्या नसाव्यात. परंतु पेण शहराचा एक फेरफटका मारल्यावर जे दृश्य नजरेस पडते ते अत्यंत काळजी करणारे आहे.

प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा गुटख्याच्या गर्तेत अडकले आहे. एवढेच काय या गुटख्यावर नियंत्रण ठेवण्याची कायद्याने जबाबदारी असलेल्या अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या धरमतर रोडवरील कस्तुरी प्लाझा वरील कार्यालयाच्या 500 मीटर परिसरातच गुटख्याची विक्री होताना दिसते. गुटखा बंदी ही कागदावरच असल्याचे चित्र सर्वदूर आहे. गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट चालविले जाते.

अंमली पदार्थांचे सेवन
विद्यार्थी व तरुणाई केवळ गुटख्याच्याच आहारी गेलेली नसून गांजा, ब्राऊन शुगर, अफीम, एमडी या सारख्या अंमली पदार्थांनीही त्यांना विळखा घातला आहे. प्रतिष्ठीत नेते मंडळींची बिघडलेली मुले तर चलनी नोटांमध्ये गांजा-ब्राऊन शुगर टाकून सार्वजनिक ठिकाणी ती ओढत असल्याचे चित्र कित्येकांनी पाहिले आहे. पेण शहराच्या पूर्वेकडील कासमाळ परिसरात हे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होतात. पेण फणसडोंगरी परिसरात यापूर्वी अनेक वेळा गांजा पकडल्याच्या घटना झाल्या. वडखळ, गोर्विले, खारपाडा या परिसरात देखील गांजा विर्केत्यांना पकडले. परंतु नंतरच्या काळात हेच गांजा विर्क्रेते पोलीसांचे खबरे म्हणून काम करताना पहायला मिळाले.

पेण शहरात पेण प्रायव्हेट हायस्कूल ही 100 वर्ष जूनी शिक्षण संस्था आहे. त्याच्या बाजूला उभ्या राहिलेल्या अनधिकृत टपऱ्यांविरूध्द संस्था चालकांनी वेळोवेळी नगरपालिकेला लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु आजतागायत नगरपालिका प्रशासन ठसकी मस झालेला नाही. त्याच बरोबर पेण येथील दुसरी महत्वाची शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्र शिक्षण संस्था. महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या प्रवेश द्वारापासून हाकेच्या अंतरावर आपल्याला टपऱ्या पहायला मिळतात. त्यानंतर पेण म्हाडा वसाहतीत गुरूकुल संस्था त्याच बाजूला नगरपालिकेची प्राथमिक शाळा आहे. तर पेण नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांच्या शेजारी मोठया प्रमाणात आपल्याला हया टपऱ्या पहायला मिळतात. आणि गुटक्याची सर्वात जास्त सर्रास विक्री जर कुठे होत असेल तर ती टेकनिकल कॉलेजच्या शेजारी. टेकनिकल कॉलेजच्या संरक्षण भिंंतीच्या शेजारी अशा प्रकारची टपरी असून बरोबर 100 मिटर अंतरावर पतंगराव कदम महाविदयालय आहे त्याच्याच शेजारी पेण तालुक्याचे न्यायालय आहे. हीच स्थिती पॉलीटेकनिकल शेजारी पहायला मिळते.

मी नव्याने रायगडमध्ये रुजु झालो आहे ज्या- ज्या शैक्षणिक संस्थाबाहेर नियमबाहय टपऱ्या अगर दुकाने आहेत त्यांच्यावर कारवाई ही माहिती घेउन केली जाईल. जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांचा कोण उल्लंघन करीत असतील तर त्याविरुध्द कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल.

एम. आर. घोसाळवाड, अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख
Exit mobile version