रायगड जिल्ह्यातील शाळांना पुन्हा टाळे; कोरोनामुळे जिल्हाधिकार्‍यांनी दिले आदेश

। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे व रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये संक्रमणाचा धोका विचारात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्हा क्षेत्रातील पनवेल महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामीण क्षेत्रातील इयत्ता 1 ते 9 आणि इयत्ता 11 वी चे सर्व वर्ग बंद करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाला जारी केले आहेत.

या आदेशाप्रमाणे इ. 1 ली ते 9 वी आणि इ. 11 वी चे वर्गामधील प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन दि.5 ते दि.31 जानेवारी 2022 पर्यंत बंद राहील. इ.1 ली ते 9 वी आणि इ. 11 वी चे वर्गामध्ये ऑनलाईन पध्दतीने अध्ययन शासन स्तरावरून वेळोवळी देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सुरु राहील. इ. 10 वी व 12 वी ची बोर्डाची परीक्षा जाहीर झाली असून विद्यार्थ्यांचे जानेवारी व फेब्रुवारी 2022 मध्ये अंतर्गत मूल्यमापन व प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने इ. 10 वी व 12 वीच्या वर्गामध्ये नियमांचे पालन करुन प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन पूर्ववत सुरु राहील. वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण आवश्यक राहील. यापूर्वी लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध लागूच राहतील.

कोविड-19 विषाणूचा वाढत्या प्रादूर्भावामुळे व रुग्णसंख्येमुळे शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील दि.30 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये दि.31 डिसेंबर 2021 पासून राज्यात अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले.

सद्य:स्थितीत राज्यात व रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण आणण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे आवश्यक आहे. त्यानुसार वेळोवेळी शासन स्तरावरुन तसेच या कार्यालयाच्या स्तरावरून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत. या आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती/आस्थापना कारवाईस तसेच दंडात्मक व तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

Exit mobile version