विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
44 माध्यमिक, तर 128 जि.प. शाळा सुरु
। नेरळ । वार्ताहर ।
कोव्हिडच्या आक्रमणानंतर तब्बल दीड वर्षांनी कर्जत तालुक्यातील शाळा शासनाच्या आदेशाने उघडण्यात आल्या आहेत. कर्जत तालुक्यातील इयत्ता पाचवी ते दहावी आणि कनिष्ठ महाविद्यालया मध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली असून ज्ञान मंदिर उघडल्याने विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग खुश आहे. दरम्यान, तालुक्यातील 44 खासगी माध्यमिक विद्यालये आणि 128 जिल्हा परिषद शाळांची घंटा 4 ऑक्टोबर रोजी वाजली आहे.
कर्जत तालुक्यात इयता पाचवी ते बारावी चे वर्ग शासनाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तालुक्यात 49 खासगी माध्यमिक शाळा असून 128 जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवी पर्यन्त वर्ग भरवले जातात. शासनाने आदेश दिल्यानंतर गेली काही दिवस रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल दीड वर्षांनी शाळा उघडल्या जाणार असल्याने शिक्षक वर्गाची लगबग पाहायला मिळाली. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 240 प्राथमिक शाळा असून त्यातील 129 शाळा या पाचवी पासून आठवी पर्यन्त शिक्षण देतात. त्यामुळे शासनाच्या आदेशाने इयत्ता पाचवी ते आठवी इयत्तेचे शिक्षण देणार्या 128 शाळा आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या दिसून आल्या.
सावळे येथील गावात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने तेथील शाळेचे वर्ग सुरू झाले नाहीत. अन्य ठिकाणी शिक्षकांनी स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने शाळेच्याआवाराची स्वच्छता करून घेतली, त्याचवेळी शिक्षक वर्गाने 1 ऑक्टोबर रोजी जाहीर केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या आवारात पताका लावून, रंगीबेरंगी फुगे लावून केले. काही शाळांनी तर यापुढे जाऊन विद्यार्थ्यांना शाळेची पुन्हा एकदा आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या पहिल्या दरवाजाला रिबीन लावून विद्यार्थ्यांना ती फित कापायला लावली.असे काहीसे उत्साहवर्धक वातावरण ग्रामीण भागाती ल जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिसून आले. तालुक्यातील शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी सुरेखा हिवरे, तसेच विस्तार अधिकारी, साधन व्यक्ती आणि केंद्रप्रमुख हे शाळा शाळांमध्ये फिरून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेत होते. त्यात कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील एकमेव शाळा वगळता अन्य सर्व 128 शाळा विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या दिसून आल्या.
- आमच्या संस्थेची नेरळ येथील शाळा आज दीड वर्षांनी गजबजलेली दिसून आली. माध्यमिक शाळेचे वर्ग सुरू झाले असून सिनियर कोलेज बद्दल अद्याप शासनाने आदेश दिले नाहीत, त्यामुळे त्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. मात्र पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची किमान 90 टक्के उपस्थिती वाहून शिक्षक वर्ग खुश आहे.
समीर येरुणकर, आदर्श शिक्षक
- आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आहोत आणि विद्यार्थी वर्गात नसतील तर आमचा काय उपयोग.त्यामुळे आम्ही सर्व शिक्षक शाळा सुरू होण्याची वाट पाहत होतो. आता पुन्हा नव्या जोमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान देण्यासाठी अधिक वेळ शाळेला देणार आहोत, तसा शब्द आम्ही शिक्षण अधिकार्यांना दिला आहे.
सुरेखा हिवरे, गटशिक्षणाधिकारी, कर्जत पं.स.