। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात 81.12 टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार आहे. त्यातही ग्रामीण भागातील पालकांचे प्रमाण जास्त आहे. यापुर्वी कोरोनामुक्त क्षेत्रात प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. दरम्यान, उद्यापासून कोरोनाचा संसर्ग नसलेल्या ठीकाणी शाळा सुरू केल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शाळा सुरू केल्या जाणार आहेत. याबाबत अनेक जिल्हा परिषद प्रशासनाव्दारे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
राज्यातील 6 लाख 90 हजार 820 पालकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 5 लाख 60 हजार 818 पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास होकार दिला. सर्वेक्षणात प्रतिसाद नोंदवलेल्या 6 लाख 90 हजार 820 पालकांपैकी 3 लाख 5 हजार 248 पालक ग्रामीण भागातील, 71 हजार 904 पालक निमशहरी भागातील आणि 3 लाख 13 हजार 668 पालक शहरी भागात राहणारे आहेत. सर्वेक्षणात 81.18 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास होकार दिला आहे. तर 1 लाख 30 हजार 2 पालकांनी मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे मत नोंदवले.