| पनवेल | प्रतिनिधी |
1 एप्रिलपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून, शाळांच्या परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थी पुन्हा शाळेत परतल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी पनवेलमधील शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षकांनी ‘वेलकम बॅक टू स्कूल’ असे फलक लावून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे हसतमुखाने अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पालकही स्वतः मुलांना शाळेत घेऊन येताना दिसले. लहान विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह असून, नव्या वर्गात जाण्याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी छोटे स्वागत कार्यक्रम, फुगे व सजावट करण्यात आली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळेचा अनुभव आनंददायी ठरला. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.






