| रायगड | प्रतिनिधी |
सुट्टी हा सर्वांचा आवडीचा विषय त्यातही शासकीय कार्यालय व शाळा यांना मिळणाऱ्या सुट्ट्या हा चर्चेचा तर अनेकांसाठी असुयेचा विषय बनतो. म्हणून वर्षभरात किती सुट्ट्या येतात व किती निमित्तमात्र मिळणार याचा हिशोब केला जात असतो. शाळेच्या बाबतीत तर ही बाब अधिक लागू होत असल्याने दिसून येते. कारण मुलांना सुट्ट्या केव्हा मिळणार व केव्हा फिरायला जाणार, याची उत्सुकता लागून असते. शालेय शिक्षण विभाग त्याची आखणी करीत तसे वेळापत्रकच जाहीर करते. तसेच आता करण्यात आले आहे.
राज्यातील शाळांची वर्षभरातील सुट्ट्याची यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना 52 रविवार वगळून वर्षभरात 76 सुट्ट्या लागू होणार आहेत. त्यात दिवाळीच्या सुट्ट्या 16 ते 27 ऑक्टोबर म्हणजे 10 दिवस मिळतील. तर उन्हाळी सुट्ट्या 2 मे ते 13 जून म्हणजेच 38 दिवसाच्या राहणार आहेत. अश्या सर्व मिळून वर्षभरात 128 दिवस सुट्ट्या राहणार आहेत. काही सूचना पण शालेय शिक्षण विभागाने केल्या आहेत. गावच्या यात्रेचा अपवाद वगळून सलग तीन दिवस शाळा बंद राहणार नाहीत, याची खबरदारी शाळेच्या मुख्याध्यापकांना घ्यायची आहे.
आदेशानुसार स्थानिक परिस्थिती तपासावी. नमूद यादीतील तारखेला संबंधित सण येत नसल्यास मुख्याध्यापकांनी सुट्टी देण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता त्यास घेतली पाहिजे. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांची पूर्व मान्यता घ्यावी. मुख्याध्यापक अधिकारात सुट्टी घेत असतांना त्या मुख्याध्यापकाने तीन दिवस पूर्वी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्याकडे लेखी कळवावे. तसे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच अशी राहणार आहे.
शिक्षण विभागाने केली यादी जाहीर
वर्षभरातील सुट्ट्या- जुलैमध्ये आषाढी एकदशी, मोहर्रम, नागपंचमी, ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी, सप्टेंबरमध्ये गौरी विसर्जन, ईद-ए-मिलाद, अनंतचतुर्दशी, घटस्थापना, ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती आणि दिवाळी, नोव्हेंबरमध्ये गुरूनानक जयंती, डिसेंबरमध्ये ख्रिसमस-नाताळ, जानेवारीमध्ये मकरसंक्रांती, प्रजासत्ताक दिन,
फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मार्चमध्ये धुलिवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती, एप्रिलमध्ये गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, मेमध्ये महाराष्ट्र दिन, उन्हाळी सुट्टी. अशा वर्षभराच्या सुट्ट्या शासनाकडून जाहीर झाल्या आहेत.






