कमी पटसंख्येच्या शाळांचा होणार ‘क्लस्टर’

33 समूह शाळा निर्मितीवर भर; 82 शाळांचे करणार एकत्रीकरण

। रायगड । सुयोग आंग्रे ।

जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास यात राहणारी कमतरता हा मुद्दा शालेय शिक्षण विभागाने ऐरणीवर आणला आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी क्लस्टर शाळेचा प्रयोग राबविला जाणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील कमी पटसंख्या असणार्‍या शाळांचे एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांना सादर केला आहे. 82 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 33 समूह शाळा निर्मितीवर भर दिला जाणार आहे. या समूह शाळांमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांमधील एक हजार 159 विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी 124 शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक स्पर्धेच्या युगात रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपली गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. शाळेची पट संख्या वाढावी यासाठी शिक्षकांसह लोकप्रतिनिधींनी देखील प्रयत्न केल्याचे सर्वश्रुत आहे. परंतु असे असतानाही खासगी शिक्षणसंस्थांच्या शर्यतीत जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडल्या आहेत. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या पाल्याला शिक्षण देण्यासाठी पालकांचा कल अधिक पाहावयास मिळाला आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी होऊन शाळा बंद झाल्या आहेत. पटसंख्या कमी होऊन शाळा बंद होऊ नये यासाठी शाळांचा क्लस्टर करण्याचा पर्याय रायगड जिल्हा परिषदेने अवलंबला आहे.

रायगड जिल्ह्यातील दुर्गम असणार्‍या सात तालुक्यांमधील तब्बल 82 शाळांचा क्लस्टर करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांकडे सादर केला आहे. यामध्ये कर्जत 5, खालापूर 10, म्हसळा 8, पोलादपूर 11, सुधागड 10, श्रीवर्धन 5 आणि पेण तालुक्यातील 33 शाळांचा समावेश आहे. या शाळा 33 शाळांमध्ये समायोजित करण्यात येणार आहेत. यामुळे तब्बल 1 हजार 159 विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 82 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कर्जत 2, खालापूर 1, म्हसळा 1, पोलादपूर 1, सुधागड 3, श्रीवर्धन 3 आणि पेण तालुक्यातील 22 शाळांमध्ये शिक्षणाचा मार्ग खुला केला जाणार आहे. या शाळांमध्ये 2 हजार 118 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता या विद्यार्थ्यांमध्ये एक हजार 159 विद्यार्थ्यांची भर पडणार आहे. शिक्षण आयुक्तांकडे सादर केलेल्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यास रायगड जिल्ह्यात समूह शाळांचा प्रयोग यशस्वी ठरणार आहे.

अशी असणार क्लस्टर शाळा
अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र आणणारी एक शाळा म्हणजे 'क्लस्टर' शाळा. कमी पटसंख्येच्या शाळा असलेल्या भागातील काही अंतरावरील एक मध्यवर्ती शाळा निवडून त्याशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जाणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून या शाळेत यावे लागते. क्लस्टरशाळेपर्यंत पोचविण्यात विद्यार्थ्यांना येण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांचा प्रवास खर्च सरकारतर्फे करण्याच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. किंवा कंपनी अथवा स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाचा विचार केला जाणार आहे.

शिक्षणाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास, समाजात मिसळण्याची वृत्ती, सामाजिक भान, खिलाडूवृत्ती आणि परस्परांना समजून घेण्याची कला देखील विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. परंतु एक दोन, किंवा पाच-दहा पटसंख्येच्याशाळांच्या माध्यमातून ही उद्दिष्टे साध्य करणे कठीण असते.अनेक खेळ आणि क्रीडा विषयक संधी त्यांना उपलब्ध होत नाहीत. म्हणून क्लस्टर शाळांचा प्रयोग राबविण्याचे विचाराधीन आहे. रायगड जिल्हा परिषदेने 82 शाळांच्या एकत्रीकरणाचा म्हणजेच 33 समूह शाळा निर्मितीचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे सादर केला आहे. अद्याप त्या प्रस्तावावर कोणतेही मार्गदर्शन उपलब्ध झालेले नाही.

पुनिता गुरव
प्राथमिक शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version