खारपाडा शाळेत चमत्कारामागील विज्ञान उपक्रम

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

| चिरनेर | प्रतिनिधी |

खारपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी शाळेत, मंगळवारी (दि.16) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पेण शाखेच्या वतीने ‌‘चमत्कारामागील विज्ञान’ हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासोबतच अंधश्रद्धेविरुद्ध जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी समितीचे कार्यकर्ते जगदीश डंगर यांनी विविध तथाकथित चमत्कारांमागील विज्ञान, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितले. समाजात अनेकदा चमत्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात विज्ञानाच्या साध्या तत्त्वांवर आधारित असतात, हे त्यांनी प्रयोगातून प्रभावीपणे स्पष्ट केले. त्यांच्या या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल मोठे कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली.

कार्यक्रमात समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ आणि चिकित्सक विचारसरणी अंगीकारण्याचे मार्गदर्शन केले. तसेच शाळा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक प्रवीण यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना बुवा-बाबा, चमत्कार व अंधश्रद्धेला बळी पडू नका, असे आवाहन केले. शिक्षणाबरोबरच विवेकशील आणि वैज्ञानिक विचारसरणी विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रमाकांत घरत, पत्रकार कैलासराजे घरत, दिनकर सर, प्रगती मॅडम, ज्योती मॅडम, सुरेखा मॅडम, प्रियांका मॅडम, विद्या मॅडम यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

Exit mobile version