। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे जिल्ह्यात भाजपचे नऊ तर शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपालाच मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट यांच्यात या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवून त्या ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाबरोबरच भाजपनेही कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपाचा स्ट्राईक रेट 100 टक्के असून त्यांचे नऊ आमदार निवडून आले आहेत. तर, शिंदे गटाचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व दिसून येत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. विकासनिधी आणि प्रकल्पांच्यादृष्टीने पालकमंत्रिपद महत्त्वाचे असल्याने या पदासाठी भाजपाने जोर लावला असून शिंदे गटदेखील यासाठी प्रयत्नशील आहे.
शिंदे सरकार सत्तेवर असताना ठाण्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या शंभुराज देसाई यांच्याकडे होते. त्याआधी 2014 ते 2019 आणि 2019 ते 2022 या कालावधीत शिंदे यांच्याकडेच पालकमंत्रिपद होते. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देसाई यांच्याकडे सोपवली होती. आता शिंदे उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्यात यावे, अशी सेनेची मागणी आहे. तसेच, जिल्ह्यात भाजपचे अधिक आमदार असल्याने पालकमंत्रिपद आम्हाला मिळावे, असा भाजप नेत्यांचा दावा आहे.






