निवासी संकुलाच्या जागेवर भंगाराच्या गाड्या

पोलीस वसाहतीची प्रतिक्षा कायमच

| अलिबाग | प्रमोद जाधव |

अलिबाग येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी वसाहत जीर्ण झाल्याने त्या जागी नवीन वसाहत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. रायगड पोलिसांकडून प्रस्तावही पाठविण्यात आला. त्याला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रीयेचा काम सुरु आहे. जीर्ण झालेल्या इमारतीवर हातोडा मारून ती जागा मोकळी करण्यात आली. निवासी संकुलाच्या जागेवर भंगाराच्या गाडया ठेवण्यात आल्या आहेत. तसेच ही जागा पार्कींगसाठी केली जात आहे. मात्र पोलीस कर्मचारी आजही भाड्याच्या घरात राहत आहेत.

रायगड पोलीस दलात उरण व पनवेल तालुके वगळता 13 तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सुमारे 20 लाख लोकसंख्येच्या सुरक्षेची जबाबदारी दोन हजार 330 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. त्यात 150 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील पोलीस वसाहतींची अवस्था बिकट असताना, जिल्हा मुख्यालयात राहणारे काही पोलीस आजही बेघर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.

अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानासमोर बैठ्या घरांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत होती. लहानशा जागेत पोलीस आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होते. पोलीस राहत असलेली वसाहत जीर्ण झाल्याने त्याजागी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला. जीर्ण झालेली वसाहत पाडून ती जागा मोकळी करण्यात आली. हक्काचे घर मिळणार यासाठी पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

मात्र गेली अनेक वर्ष उलटूनही कर्मचाऱ्यांना अजुनही हक्काची घरे मिळाली नसल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून 380 घरे उभारली जाणार आहेत. मात्र सीआरझेड व अन्य परवानग्यांसाठी हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. परंतु गेली अनेक वर्षे पडून असलेल्या निवासी संकुलाची जागा ओस पडली आहे. या जागेमध्ये आता पोलीसांच्या भंगाराच्या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अन्य कार्यक्रमाच्यावेळी या जागेचा वापर वाहने पार्कींगसाठी केला जात आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र आजही हक्काच्या घराची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

घरभाडे न परवडण्यासारखे
पोलिस कर्मचारी राहत असलेल्या जागेमध्ये नवीन संकुल उभारले जाणार असल्याने कर्मचारी सध्या भाड्याने अन्य ठिकाणी राहत आहेत. अलिबागसह परिसरातील जागेला सोन्याचे मोल आले आहेत. वाढत्या महागाईमुळे घरभाड्यांच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे घरभाडे न परवडण्यासारखी स्थिती पोलिसांची झाली आहे. त्यामुळे महिन्याचा आर्थिक ताळमेळ जुळविताना पोलीसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पोलीस मुख्यालयातील 380 पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित प्रकल्प आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. निविदा प्रक्रिया 15 दिवसात सुरु केल्या जातील. पहिल्या टप्प्यात 200 घरांचा प्रस्तावित प्रकल्प आहे.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
36 कर्मचाऱ्यांना मिळाली घरे
पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून हालचाली सुरु आहेत. मात्र या कामाला फारसी गती मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या काही वर्षापुर्वी उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये फक्त 36 कर्मचारी राहत आहेत. राहत असलेल्या या इमारतीमध्ये अंमलदार व अधिकाऱ्यांचादेखील समावेश असल्याची चर्चा पोलिस दलात सुरु आहे.
Exit mobile version