उमेदवारी माघारीसाठी एकच दिवस
| सोलापूर | प्रतिनिधी |
सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी तीन हजार 617 मतदान केंद्रे असून त्यात 27 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. यंदा पहिल्यांदाच एक हजार 840 मतदान केंद्रे वेब कास्टिंगच्या निगराणीखाली असणार असून त्याठिकाणची प्रत्येक हालचाल थेट निवडणूक आयोगासह जिल्हाधिकार्यांना पाहता येणार आहे. उमेदवारांना अर्ज भरायला येताना रॅली काढायची असल्यास त्याची पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागणार असून त्यात केवळ दहा वाहने अपेक्षित आहेत.
दरम्यान, खुल्या प्रवर्गातील उमेदवारास लोकसभा निवडणुकीसाठी 25 हजार रुपये तर मागासवर्गीय उमेदवारास साडेबारा हजार रुपयांची अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागणार आहे. स्वत:वरील दाखल गुन्हे, मुले, उत्पन्न व उत्पन्नाचे स्रोत अशी संपूर्ण माहिती अर्जात द्यावी लागणार आहे. 20 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून अर्ज माघारीनंतर 23 एप्रिलला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर 23 एप्रिल ते 5 मे पर्यंत प्रचाराची रणधुमाळी आणि 7 मे रोजी मतदान, असा निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.