कुणी कामगार देता का?

गणेशमूर्तीकारांचे आवाहन
| पेण | प्रतिनिधी |
कुणी कामगार देता कामगार, अशी म्हणण्याची वेळ पेणमधील गणेशमूर्ती कारखानदारांवर आलेली आहे. सरकारने अचानक पिओपी बंदीची टांगती तलवार गणपती कारखानदारांच्या डोक्यावर ठेवली असल्याने गणपती कारखानदारांनी पीओपीकडून मोर्चा लालमाती व शाडूचीमाती, कागदाचा लगदा याच्याकडे वळवला आहे. त्यामुळे आज मूर्तीकारांना कामागारांची मोठी निकड भासू लागली आहे.

आज पेण तालुक्यात 1600 पेक्षा जास्त कारखाने कार्यरत आहेत या कारखान्यांमध्ये 35 ते 40 हजार कुशल, अकुशल कामगार काम करत आहेत. असे असताना देखील आज कामगारांचा तुटवडा गणपती कारखानदारांना भासत आहे. गणपती कारखान्यात काम करणाऱ्या कुशल अकुशल कामगारांना रोजगारही चांगला उपलब्ध होतोय. साधारणता 500 रूपया पासून 1000 रूपया पर्यत दिवसाची मजुरी आहे. तर तासावर काम करणाऱ्या कारागीरांना 60 रूपयांपासून 100 रूपयांपर्यत मोबदला भेटत आहे. असे असताना आज कामगारांची कमतरता ही भासते ही मोठी बाब आहे.

पेण तालुक्याचा आर्थिक गाडा हा पूर्णता गणपती व्यवसायावर चालत आहे. गणपती व्यवसायामध्ये अकुशल कामगार 15 हजाराच्या पुढेच दरमहा कमावतो. तर कुशल कामगार हा 25 ते 30 हजार रूपये कमवतो. तरी देखील खोटया प्रतिष्ठेपायी तरुण वर्ग गणपती व्यवसायात काम न करता कंपन्यामध्ये काम करतो. हे ही तेवढेच वास्तव आहे.

पेण तालुक्यात असणारे गणपती कारखानदाराकडे आता कामगार नसल्याने मोठया प्रमाणात त्यांची फसगस झाली आहे. दोनच महिन्यावर गणपती उत्सव येऊन ठेपला आहे. खऱ्या अर्थाने कारखानदारांची आता कामाची लगबग अंतिम टप्प्यात आली असताना कामगार व त्यातच विजेचा असणारा लपंडाव या दोन्ही बाबींमुळे मोठया प्रमाणात कामामध्ये व्यत्यय येत आहे. कामगारांचा वानवा असाच राहिला तर उत्पादनावर त्याचा फरक पडेल एवढे निश्चित.

शासनाने पिओपीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने आम्ही कारखानदारांनी मातीकडे मोर्चा फिरवला आहे. आज माझ्या कारखान्यात सात ते आठ हजार बाप्पाच्या मूर्ती या मातीच्या आहेत. माती काम करताना यासाठी लागणाने कामगार हे कुशल कामगारच लागतात. त्यातच कामाचा वेग संथ असतो त्यामुळे पीओपी प्रमाणे उत्पादन जलदगतीने होत नाही. त्यासाठी कारागीरच जास्तीचे ठेवावे लागतात. परंतु पेण तालुक्यामध्ये आज कारागीरांची कमतरता असल्याने गणपती उत्सवासाठी घेतलेला काम वेळेत पुरा होईल की नाही या बाबत शासंका निर्माण झाली आहे. आम्ही रोजंदारीही चांगली देत आहोत शासन नियमापेक्षा तिप्पट्टीने आम्ही पैसे मोजत आहेत. आज माझ्या कारखान्यात 40 ते 45 कारागीर आहेत तरी देखील ते मला कमी पडत आहेत.इतर कारखान्यात हीच अवस्था आहे.

गणेश पवार (गणेश कला केंद्र कोंबडपाडा)


Exit mobile version