‘त्या’ रिक्षा अपघाताची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील धामणदिवी गावाच्या वळणावरील कशेडी घाटातील रस्ता खचला आहे. गेल्यावर्षी याच ठिकाणी डंपर-रिक्षा अपघातात रिक्षातील चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधीत विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणदिवीपासून काही मीटरच्या अंतरावर आणि पोलादपूरपासून 9 कि.मी. अंतरावरील साधारणपणे 150 मीटर्स लांबीचा रस्ता 2005 पासून खचत असून दरवर्षी याठिकाणी लाखो रूपयांची मलमपट्टी होत असते. यावर्षी पावसाळयामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गावरून गणेशोत्सव काळामध्ये वळविण्यात आली होती. यामुळे या डेंझरझोन झालेल्या रस्त्यावरून वाहतुक कमी झाली होती. परिणामी, या रस्त्याच्या दुरूस्तीकडे सपशेल दूर्लक्ष होऊन हा रस्ता यंदा खुपच खचला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गणेशोत्सव काळातील वाहतूक चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासानंतर थांबल्यामुळे पर्यायी भुयारी मार्गाचा वापर थांबविण्यात आला. त्यानंतर पुन्हा धामणदिवीपासून काही अंतरावरील या ‘डेंजरझोन’वरील वाहतुक पुन्हा धोकादायक स्थितीत सुरू झाली.
कशेडी घाटातील या 150 मीटर्स अंतरावर असंख्य खड्डे व उंचवटे निर्माण झालेले दिसून येत आहेत. यामुळे या भागात अवजड वाहनांचा प्रवास नौकेमध्ये बसल्यासारखा हलतडुलत होत असून खड्डे व उंचवटयामुळे ही वाहने कलंडण्याची शक्यता दिसून येते. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने या डेंजरझोनची दुरूस्ती देखभाल करण्याचे काम कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचे काम करणाऱ्या शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या पोटठेकेदार कंपनीला दिले असूनही या एसडीपीएल कंपनीने या डेंजरझोनकडे सपशेल दूर्लक्ष केल्यामुळे हा 150 मीटर्सचा महामार्ग धोकादायक झाला आहे.याबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.