म्हसळा शिक्षण विभाग प्रयत्नशील
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यात दि. 5 ते 20 जुलै या कालावधीत शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी म्हसळा शिक्षण विभागाकडून विशेष शोधमोहीम करण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम 2009 राज्यात दि.1 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार वय वर्ष सहा ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे, त्यामुळे सदर बालकांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क प्राप्त आहे. अशा 6 ते 14 वयोगटातील एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहात असतील अशा बालकांना शाळाबाह्य बालक म्हणावे अशी व्याख्या शिक्षण हक्क अधिनियम नुसार केली आहे.
या मोहिमेनुसार घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बस स्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, वीटभट्टी, दगडखाणी, स्थलांतर कुटुंबे, तालुक्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, वस्त्या, तांडे- पाडे आधी ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यात स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड, विस्तार अधिकारी अरविंद मोरे व गटसमन्वयक सलाम कौचाली यांनी केले आहे.