। रत्नागिरी । वार्ताहर ।
दिवाळी हंगामासाठी दरवर्षी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडून 10 टक्के भाडेवाढ करण्यात येते; पण यंदा ही हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबरदरम्यान 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले होते; मात्र ती भाडेवाढ रद्द करण्यात आली.
सुट्टीच्या हंगामामध्ये एसटी महामंडळाकडून दरवर्षी 10 टक्के भाडेवाढ केली जाते; पण यंदा हा निर्णय रद्द करण्यात आला असून, प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता; पण या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांमध्ये दिवाळी येत असून शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. याचाच फायदा घेत अनेक कुटुंबे गावी किंवा पर्यटनस्थळांना भेटी देतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा होते. एसटीची प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होणार होती; पण ती भाडेवाढ रद्द करण्यात आली. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीसाठी भाडेवाढ लागू करण्यात आलेली नव्हती. राज्य परिवहन महामंडळाला सध्या रोज 23 ते 24 कोटी रुपयांचे उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून मिळते. दिवाळीत करण्यात येणार्या हंगामी भाडेवाढीमुळे त्यात अधिक 6 कोटी रुपयांची भर पडते. महिन्यात महामंडळाचे उत्पन्न 950 ते एक हजार कोटी रुपये होते. आता दर वाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. मात्र दुसरीकडे प्रवाशांमधून समाधान व्यक केले जात आहे.






