। मुंबई । प्रतिनिधी ।
येत्या चारपाच दिवसांत, 21 मेपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाडयात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच सुमारास मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्ण लाट येण्याची शक्यता आहे.
सोमवारी अंदमानात मोसमी पावसाचे आगमन झाले. सहा दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात पोहोचला आहे. परिणामी महाराष्ट्रात देखील नैर्ऋत्य मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गुरुवारी (दि.19) मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाडयातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.