। गयाना । वृत्तसंस्था ।
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. आता दुसर्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी 17 फलंदाज बाद झाले आहेत.
वेगवान गोलंदाजांपुढे दोन्ही संघांच्या फलंदाजांनी पार गुडघे टेकले. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका 160 धावांवर बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या 97 धावांत 7 गडी बाद अशी आहे. वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच अडचणीत आणले. सलामीवीर टोनी डीजॉर्ज फक्त एक धाव काढून जेडेन सील्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर शामर जोसेफने माक्ररम आणि कर्णधार बावुमाला तीन चेंडूंत बाद केले. यानंतरही एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण खेळ करता आला नाही.
दक्षिण आफ्रिकेने 97 धावांवर 9 गडी गमावले. यानंतर डॅन पीट आणि नांद्रे बर्जर यांनी अखेरच्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. यासह दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 160 वर पोहोचली. पीएटने संघासाठी 38 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौर्यावर आश्चर्यकारक कामगिरी करणार्या शमार जोसेफने 5 फलंदाजांना बाद केले.