मुंबईत जमावबंदीचे आदेश; 144 कलम लागू

। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत गणेशोत्सवादरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबईत 10 ते 19 सप्टेंबरपर्यंत 144 कलम लावण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणार नाहीत, असे आदेश लागू केले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तलयाकडून यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या वर्षीही सणासुदीनंतरच रुग्णसंख्या वाढली होती. या पार्श्‍वभूमीवर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आगामी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कशी टाळता येईल, यावर चर्चा करण्यात आली होती.

Exit mobile version