। किल्ले रायगड । जूनेद तांबोळी ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेचा बागुलबुवा सुरक्षा यंत्रणेने केल्याने शिव पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला शिवभक्त व शिवप्रेमींनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. परिणामी, शिवपुण्यतिथीचा कार्यक्रम निष्फळ ठरल्याची चर्चा किल्ले रायगडावर असणार्या पर्यटकांच्या तोंडून ऐकण्यास मिळाली. सुरक्षा यंत्रणेच्या हुकूमशाहीचा फटका स्थानिक दुकानदारांसह पर्यटकांनाही बसला. त्यामुळे स्थानिकांसह, शिवभक्त व पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली.
किल्ले रायगडावर आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासहित राज्य मंत्रिमंडळातील आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, आदिती तटकरे, भरत गोगावले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यसभेचे खा. धैर्यशील पाटील, विधान परिषदेचे भाजपा गटनेते प्रवीण दरेकर, उदयनराजे भोसले, पेणचे आ. रवीशेठ पाटील, कर्जतचे आ. महेंद्र थोरवे, उरणचे आ. महेश बालदी, सैन्यदल अधिकारी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, सरदार घराण्याचे सन्माननीय व्यक्ती, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंहजी होळकर, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अनेक मंत्री व लोकप्रतिनिधी येणार असल्याने सुरक्षा यंत्रणेने मागील आठ दिवसांपासून महाड ते रायगडपर्यंत सुरक्षा यंत्रणेची फौज तैनात केली होती. या सुरक्षा यंत्रणेचा फटका रायगड किल्ला परिसरातील गावांना तर बसलाच, परंतु मागील आठ दिवसापासून पायरी मार्गाने किल्ल्यावर जाणारे पर्यटक व शिवभक्तांनाही बसला होता. शनिवारी (दि.12) शिवपुण्यतिथीचा कार्यक्रम असल्याने सकाळी सात वाजल्यापासूनच किल्ले रायगडकडे जाणारे रस्ते सुरक्षा यंत्रणेंनी बंद केले होते. व्हीआयपी पास असलेल्या व्यक्ती सोडून अन्य व्यक्तींना रायगड किल्ला परिसराकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे अनेक शिवभक्तांना रायगडावर जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे शिवभक्तांनी संताप व्यक्त केला.
पाण्याच्या बाटलीला बंदी
किल्ल्यावर जाताना पाण्याची बाटलीदेखील नेण्यास पोलीस यंत्रणेने मज्जाव केला होता. राज दरबारात बसलेल्या शिवभक्तांना अखेर दोन तासानंतर पिण्यासाठी पाणी पुरवण्यात आले. या दोन तासाच्या काळात कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांना पुन्हा सभागृहाच्या बाहेर सोडण्यास देखील सुरक्षा यंत्रणेनी नकार दिला. त्यामुळे भविष्यात शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला शिवभक्तांनी यावे की न यावे, असा सवालच या निमित्ताने जमलेल्या शिवभक्तांमधून विचारला जात होता.
स्थानिक दुकानदारांना धमकीची भाषा
होळीच्या माळापासून जगदीश्वर मंदिरापर्यंत स्थानिक नागरिक सरबत, ताक व छोट्या टपर्यांमधून बिस्किट, वेफर्स व शीतपेयाच्या बाटल्या विकून आपला उदरनिर्वाह पार पाडतात. केंद्रीय मंत्री अमित शाह राज सदरेवरील कार्यक्रम उरकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे जाणार होते. मात्र, त्या अगोदरच सुरक्षा यंत्रणेकडून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. उन्हातान्हातील पर्यटकांना दिलासा देण्याचे काम या छोट्या टपरीधारकांकडून केले जाते. पाणी, ताक व थंड पेयाच्या बाटल्यांच्या विक्रीतून रणरणत्या उन्हात तळपणार्या पर्यटकांना त्याचा आधार होतो. मात्र, या दुकानदारांना दुकाने बंद करा, नाहीतर तुमच्यावर कारवाई करतो अशी धमकीच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे हे देत असल्याने पर्यटक व दुकानदारदेखील नाराज झाल्याचे यावेळी पाहण्यास मिळाले. त्या ठिकाणी उपस्थित असणार्या पत्रकारांनादेखील उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी आपल्या शेलक्या शब्दात सांगून पोलिसी खाक्या दाखवू का, असा इशारा दिला. एकंदरीत उपविभागीय पोलीस अधिकार्यांची वागणूक ही अरेरावीची असल्याची चर्चा त्या ठिकाणी असणार्या पत्रकारांकडून व पर्यटकांकडून चर्चिली जात होती.
रायगडावर 700 पोलिसांचा ताफा तैनात
केंद्रीय मंत्री अमित शहा व राज्याच्या मंत्र्यांच्या सुरक्षेतेसाठी किल्ले रायगडावर सुमारे सातशे पोलिसांचा ताफा सुरक्षा यंत्रणेने ठेवला होता. त्याचा फटका वृत्तपत्र समूहाच्या प्रतिनिधींसहित इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या व युट्यूबच्या पत्रकारांनादेखील मोठ्या प्रमाणात जाणवला. राज्याभिषेक सभागृहात जाणार्या प्रवेशद्वारावर या कार्यक्रमासाठी आलेल्या शिवभक्तांना चप्पल व बूट काढून जाण्याची सक्ती सुरक्षा यंत्रणांनी केली होती. मात्र, ज्यांनी सक्ती केली तेच चप्पल व बूट घालून या ठिकाणी मिरवत होते. यामुळे पोलिसांनी व सुरक्षा यंत्रणेने कोणाच्या सल्ल्याने ही नवीन शक्कल लढवली, अशी चर्चा या ठिकाणी जमलेल्या शिवभक्तांमध्ये ऐकण्यास मिळाली.