। पनवेल । वार्ताहर ।
महावितरणाने भर उन्हाळ्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॅाक दिला आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळून निघालेल्या नागरिकावर सुरक्षा ठेवीचे अतिरिक्त ओझे जमा झाला आहे. सध्या इंधन दरवाढीच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. जीवनावश्यक साहित्याच्या किंमतीही महागल्याने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामध्ये आता महावितरणनेही हातपाय पसरले आहेत. वीज ग्राहकांची पूर्वीपासून संचित असलेली अतिरिक्त सुरक्षा ठेव तशीच असताना कंपनीने नव्याने अतिरिक्त सुरक्षा ठेवीची बिले नुकतीच दिली आहेत. महावितरणने वीजबिलांसोबत ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिलेही देण्यात आली आहेत. त्यामुळे वीज ग्राहक हवालदिल झाले असून, ठेवीचे पैसे भरायचे कोठून हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.