तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
। पनवेल/कामोठे । प्रतिनिधी ।
ज्यांच्याकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपवली जाते, त्याच व्यक्तीने माणुसकीला काळिमा फासल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातील कामोठ्यात घडली आहे. एका नामांकित धरती गृहनिर्माण सोसायटीत तैनात असलेल्या पंकज अजय सिंग या सुरक्षारक्षकाने तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे उघड झाले असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज सिंग हा संबंधित सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. लहान मुलांसाठी तो ‘वॉचमन काका’ होता. मात्र, या नराधमाने मुलांच्या निरागसतेचा गैरफायदा घेतला. 6, 7 व 9 वर्ष वयाच्या मुली सोसायटीच्या आवारात खेळत असताना पंकजने त्यांना एकटे गाठून त्यांच्याशी अश्लील चाळे करत त्याचा विनयभंग केला. या प्रकारानंतर तिन्ही मुली प्रचंड घाबरल्या होत्या. शाळेमध्ये गुड टच व बॅड टच शिक्षण देत असताना मुलींनी आपल्याला बॅड टच केल्याचे शिक्षिकेला सांगितले. शिक्षकांनी तत्काळ पालकांना बोलावून पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. आपल्या चिमुकल्यांसोबत घडलेला हा घृणास्पद प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. पालकांनी तत्काळ सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, सुरक्षारक्षाचे संतापजनक कृत्य कॅमेरात कैद झाल्याचे स्पष्ट झाले.
पालकांनी वेळ न घालवता तातडीने कामोठे पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी पंकज अजय सिंग याला बेड्या ठोकल्या असून याच्या विरोधात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘पॉक्सो’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सोसायट्यांनी सुरक्षारक्षकांची नेमणूक करताना त्यांची पार्श्वभूमी तपासणे किती गरजेचे आहे, हे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.
