कार्यवाहीस दिरंगाई करीत असल्याने आर्थिक संकटात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षारक्षक वेतनाविना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वेतन न देणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई करण्याचे आदेश असताना पनवेलचे तहसीलदार दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे वसुलीची प्रक्रिया थांबली आहे, असा आरोप सुरक्षा मंडळाने केला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तहसीलदारांच्या मनमानी कारभाराविरोधात सुरक्षा रक्षकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. याबाबत त्यांनी गुरुवारी अलिबागमधील जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विलास मोरेंसह अन्य मंडळी उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली येथील स्टील ॲथोरिटी ऑफ इंडिया (सेल) मध्ये रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रात्रीचा दिवस करून हे कर्मचारी सेवा देत आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या सुरक्षा रक्षकांचे मानधन कंपनीने थकविले आहे. मानधन थकल्याने सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महिन्यातील खर्चाचा ताळमेळ जुळविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कंपनीकडून एकूण 48 लाख रुपयांहून अधिक वसुली होणे बाकी आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी पनवेल तहसीलदार यांना पत्र देऊन वसुलीची कार्यवाही करावी, असे आदेश दिले. त्यानंतर पनवेलच्या तहसीलदारांनी कंपनीला नोटीस बजावली. दुसरी नोटीस देण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांनी केला आहे. याबाबत गुरुवारी (दि.29) सुरक्षा रक्षक मंडळातील विलास मोरे व अन्य मंडळींनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
वसुली करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाल्यावर कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. कायद्यानुसार नोटीस देण्याची वेगवेगळ्या सहा प्रक्रिया आहेत.त्यामध्ये निधी देण्याची सूचना करणे, मालमत्ता जप्त करणे, अटक करणे अशा अनेक प्रकारच्या नोटीसा बजावल्या जातात. या प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. निम्मी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोणत्याही प्रकारची दिरंगाई करण्याचा प्रयत्न केला जात नाही.
जितेंद्र इंगळे,
तहसीलदार, पनवेल (ग्रामीण)
गेल्या दोन दिवसांपूर्वी पनवेल शहर तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
मीनल भामरे,
तहसीलदार, पनवेल (शहर)
