श्रीवर्धन किनार्‍यावरील सुरक्षिततेचे मनोरे कोसळले

| गणेश प्रभाळे | दिघी |
रायगड जिल्ह्यात पर्यटन स्थळ म्हणून बाराहुन अधिक समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. मात्र, यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे सुरक्षेच्या दृष्टीने दुर्लक्षित आहेत. संबंधित प्रशासनाला अघटित घटनाचे गांभीर्य नसल्याने दिवेआगर, वेळास, आदगाव येथील उभारण्यात आलेले वॉच टॉवर दुरवस्था होऊन जमीनदोस्त झाले आहेत. सध्या येथे येणार्‍या पर्यटकांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचे दिसत आहे.

जिल्हा प्रशासन आपत्ती निवारण व्यवस्था अंतर्गत साधारण 2017 ते 2018 या साली किनार्‍यावर टॉवर वॉच बांधण्यात आले. तसेच संबंधित विभागाकडून प्रशिक्षण देऊन जीवरक्षकाची नियुक्ती करण्यात आली. वेळास, आदगाव याठिकाणी दोन व दिवेआगर येथे दोन अशा चार वर्दळीच्या ठिकाणी टॉवर उभे करण्यात आले. यामध्ये अपत्तीवेळी वापरण्यात येणारे मेघा फोन, सायरन, सर्च लाईट, लाईफ जॅकेट अशा सुविधा उपयुक्त ठरत होत्या. सुरुवातीला टॉवरचा उपयोग तटरक्षक व अन्य सागरी दल करीत असत. मात्र, सद्या दुरावस्थेत पडलेल्या या टॉवरकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. यांची देखभाल कोणाच्या अखत्यारीत आहे. व पुढे सुविधा पुरविणार कोण? असे एक ना, अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. येथील समुद्र किनारे तसे धोकादायक नाहीत. मात्र, पर्यटन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी प्रशासनाने अशा सुविधा पुरवण्याची गरज असल्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.

दिवेआगर हा सुरक्षित समुद्र किनारा आहे. मात्र, वेळेला आपत्ती प्रसंगी वाचण्यासाठी या चार किलोमीटर अंतरातील समुद्र किनार्‍यावर संबंधित प्रशासनाकडून टॉवर, दोन जीवरक्षक व इतर आवश्यक सूचना देणारे फलक माहिती अशा सुविधा देण्यात यावे. – सिद्धेश कोजबे, दिवेआगर सरपंच.

जीवरक्षकांचाच जीव धोक्यात
श्रीवर्धन पर्यटन स्थळांच्या किनारपट्टीवर वॉच टॉवर नाहीत. गेली कित्येक वर्षे मानधन विना जीवरक्षकांची नेमणूक असून जीव वाचवण्यासाठी लागणारे साहित्य नसल्याने सुरक्षा धोक्यात आहे. संबंधित अधिकारी चार वर्षात फिरकलेच नाही.

Exit mobile version