जिल्ह्यात बीज प्रक्रिया अभियान

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पावसाळा सुरू झाल्यावर भात पेरणीची लगबग सुुरू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागामार्फत बीज प्रक्रिया अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला गावागावातून उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पुरुष व महिला शेतकरी या अभियानात स्वयंस्फुर्तीने सहभागी होत असून बियाणे खरेदीपासून अनेक माहिती कृषी विभागाकडून दिली जात आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये भाताचे क्षेत्र एक लाख हेक्टरहून अधिक आहे. पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी शेती करतात. पावसाळा सुरु होण्यासाठी बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची आता बियाणे खरेदीची लगबगदेखील वाढणार आहे. त्या निमित्ताने कृषी विभागाने जिल्ह्यात बीज प्रक्रिया अभियान सुरु केले आहे. 25 मे पासून हे अभियान सुरु झाले असून 6 जूनपर्यंत राहणार आहे. गावे, वाड्यांमध्ये जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधून बीज प्रक्रियेचे महत्व पटवून देण्याचे काम कृषी सहाय्यकांकडून केल जात आहे. या अभियानाला गावागावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बियाणे खरेदीपासून त्यावर प्रक्रिया करण्याबाबत सर्वच प्रकारची माहिती बैठकीच्या माध्यमातून दिली जात आहे. तसेच, प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देण्याचे काम केले जात आहे.

Exit mobile version