श्रीवर्धनमध्ये बीज प्रक्रिया मोहीम सुरू

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
चालू खरीप हंगामामधे तालुका कृषी विभागामार्फत बीज प्रक्रिया मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. धान उत्पादन वाढीमध्ये बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून जमिनीतून व बियांणाद्वारे पसरणार्‍या रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोरदार वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया कमी खर्चात अत्यंत प्रभावी साधन आहे. या दृष्टीने खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर बीज प्रक्रिया केलेल्या बियाणांची पेरणी करण्याच्या दृष्टीने मोहीम स्वरूपात 23 मे ते 4 जून या पंधरवड्यात राबविण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.


बीज प्रक्रिया मोहीम लोक सहभागातून विनाअनुदान तत्वावर राबविण्यात येणार असून बियाणे बदल कमी असलेला भात पिकामधे शेतकर्‍याकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त आहे. अशा बियाणावर जमिनीतून व बियांणाद्वारे होणार्‍या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीक संरक्षणावरील खर्चामुळे उत्पादन खर्चात वाढ होते त्यामुळे उत्पादन घटते. बीजप्रक्रिया मोहिमे अंतर्गत शेतकर्‍यांना स्वतः कडील मागील वर्षाचे घरगुती वापरात येणार्‍या बियाणास बीजप्रक्रिया करण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भात बियाण्यास बीजप्रक्रिया व जीवाणू खताची बीजप्रक्रिया याचा त्यात समावेश आहे.
तालुक्यातील मौजे कारिवणे येथे या मोहिमे अंतर्गत बीजप्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दाखवण्यात आली तसेच कृषी विभागाच्या योजनांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक दौलत कुंभार, कृषी सहाय्यक सचिन जाधव, योगेश महाले, कृषी मित्र अक्षय चोरगे व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version