सचिनच्या बॅटिंगची कॉपी करायचो


सेहवागने केला खुलासा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला गेलेला वीरेंद्र सेहवाग एकेकाळी फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या फलंदाजी शैलीची कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा, यावर तुमचा विश्‍वास बसणार नाही. पण खुद्द वीरेंद्र सेहवागने याची कबुली दिली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन-सेहवाग जोडीने घातलेला धुमाकूळ आणि त्यांच्या पार्टनरशीपची उदाहरणे आजही दिली जातात. सेहवाग धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जायचा. अनेकदा सचिनपेक्षा सेहवागचा स्ट्राइकरेट अधिक असायचा. पण सचिन आपला नेहमीच आदर्श राहिल्याचे सेहवाग आदराने सांगतो. सचिनसारखेच तंत्रशुद्ध फलंदाजी करायला मला आवडायचे असे सेहवाग म्हणाला.

क्रिकगुरू अ‍ॅपचे संस्थापक संजय बांगर यांच्या अ‍ॅप लाँचच्या कार्यक्रमासाठी सेहवाग उपस्थित होता. त्यावेळी सेहवागने सध्या मिळत असलेल्या सुविधांवरही भाष्य केले. एखाद्याशी ऑनलाइन व्हिडिओ कॉलने बोलता येईल किंवा व्हिडिओ सबस्क्राइब करुन काही शिकता येईल अशा सुविधा आमच्यावेळी उपलब्ध नव्हत्या. अशा जर सुविधा तेव्हा उपलब्ध असत्या तर मी नक्कीच त्यांच्या उपभोग घेतला असता आणि आणखी चांगले शिकू शकलो असतो, असे सेहवाग म्हणाला.

Exit mobile version