| चणेरा | प्रतिनिधी |
रोहे शहरातील रायकर पार्क परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली चारचाकी वाहने अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या सहाय्याने थेट खाली ढकलल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सरकारी ताब्यातील वाहनांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित विभाग त्या व्यक्तिचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहे शहरातील मध्यवर्ती रायकर पार्क येथे उत्पादन शुल्क दारूबंदी विभागाचे कार्यालय आहे. या विभागाने दारूच्या विविध गुन्ह्यांमध्ये वापरलेली काही वाहने जप्त करून कार्यालयाशेजारील रस्त्याच्या कडेला उभी केली होती. ही वाहने गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तेथेच होती. मात्र, सोमवारी (दि.25) रात्री एका व्यक्तीने जेसीबीच्या साहाय्याने ही वाहने रस्त्यावरून विरुद्ध बाजूस ढकलून दिल्याचे उघड झाले आहे. या घटनेत चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. नगरपालिकेकडूनही वाहने हटवण्याबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे अचानक हा प्रकार का घडवून आणला गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे भविष्यात न्यायालयाच्या आदेशाने संबंधित वाहनमालकांना वाहने परत देण्यात आली, तर नुकसानभरपाईची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही उत्पादन शुल्क विभागासमोर उभा ठाकला आहे. दरम्यान, ही वाहने रोह्यातील एका तरुण राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून हटवण्यात आल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
जप्त गाड्या रस्त्याखाली ढकलल्या
