| शिर्डी | वृत्तसंस्था |
शिर्डी येथील साईबाबा देवस्थान देशभर प्रसिद्ध झाले आहे. देशातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान शिर्डी आहे. यामुळे शिर्डीत देशभरातून भाविक येत असतात. त्यासाठी शिर्डीसारख्या छोट्या शहराचा विकास चांगला करण्यात आला. रेल्वे स्टेशन आणि विमानतळ सुरु करण्यात आले. त्याच शिर्डीतील विमानतळाला आता नोटीस देण्यात आली आहे. आठ कोटी तीस लाखांचा कर थकल्याप्रकरणात शिर्डी विमानतळाला ही नोटीस शिर्डी ग्रामपंचायतीने बजावली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही नोटीस बजावल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
शिर्डी विमानतळ हे कोपरगाव तालुक्यातील काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. विमानतळ प्राधिकारणाने काकडी ग्रामपंचायतचा 8 कोटी 30 लाखांचा कर थकवला आहे. यामुळे ग्रामपंचायतीने शिर्डी विमानतळ प्रशासनाला जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले आहे. 2017 पासून विमानतळ प्रशासनाकडून विविध स्वरुपातील कर थकीत आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही थकबाकी जमा होत नाही. यामुळे ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे. विमानतळ प्राधिकरण, मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही कराची रक्कम जमा झाली नाही. यामुळे ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस पाठवली आहे. विमातळाची टर्मिनल बिल्डिंग, पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले आहे. कर जमा न केल्यास आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याचा इशारा सरपंच पूर्वी गुंजाळ आणि उपसरंपच भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.