। नेरळ । प्रतिनिधी ।
केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालय समिती यांच्या मार्फत राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ खेळासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा शालेय पातळीवर नुदुरबार येथे घेण्यात आल्या होत्या. या विद्यालय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी संबोधी संघपाल वाठोरे ही 14 वर्षाखालील गटात तर मनस्वी विठ्ठल दिवाने ही 17 वर्षाखालील गटामध्ये सहभागी झाली होती. दरम्यान, या स्पर्धेत संबोधी वाठोरे ही प्रथम आली असून मनस्वी दिवाने तृतीय क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर आपली दावेदारी सिद्ध केली आहे. तर, अहमदाबाद येथे झालेल्या रिजनल लेव्हल स्पर्धेतही संबोधी वाठोरे प्रथम आणि मनस्वी दिवाने हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर होणार्या स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे. ऑगस्ट 2024 मध्ये आसाम येथे होणार्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाकडून या दोन्ही खेळाडू नेतृत्व करणार आहेत.







