| अलिबाग | प्रतिनिधी |
राज्यस्तरीय शालेय कबड्डी निवड चाचणी मुलींच्या (17 वर्ष वयोगट) स्पर्धा पालघर येथे नुकत्याच पार पडल्या. राज्यस्तर शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी बीड यांच्या मार्फत 28 ते 30 नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे. सदर स्पर्धेच्या 17 वर्षाआतील मुलींच्या विभागीय स्पर्धेतून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत सानिका गोळे पात्र ठरली. पीएनपी माध्यमिक शाळा वेश्वीची विद्यार्थिनी सानिका संदीप गोळे हिची संघात निवड करण्यात आलेली आहे. या राज्यस्तरीय निवड चाचणीमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी अंतिम संघ निवडला जाणार आहे.
सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत पीएनपी संस्थेचा कायम दबदबा राहिला आहे. अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय खेळाडू पीएनपीने घडवले आहेत. सानिका गोळेची निवड झाल्यामुळे पीएनपीच्या शाळेमध्ये आणि संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.
सानिका गोळे हिची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, खजिनदार नृपाल पाटील, शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.