। पाली/बेणसे । वार्ताहर ।
साडवली सह्याद्रीनगर येथील रहिवासी प्रशांत सुर्वे यांची बंगाल वॉरियर्स कबड्डी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. सुर्वे यांनी कबड्डीच्या माध्यमातून साडवलीसह संगमेश्वर तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. प्रशांत सुर्वे यांनी सह्याद्रीनगर साडवली कबड्डी संघातून खेळाला प्रारंभ केला. महाविद्यालयीन जीवनात मुंबई युनिव्हर्सिटी संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. युनियन बँक स्पोर्ट बोर्ड मधून 7 वर्षे नॅशनल स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे. युनियन बँक, रत्नागिरी जिल्हा संघाचे व महाराष्ट्र संघाचे कोच म्हणून सुर्वे यांनी चोख कामगिरी बजावली आहे. बंगाल वॉरियर्स संघाचे असिस्टंट कोच म्हणून गतवर्षी उत्कृष्ट काम केले होते. याची दखल घेत प्रशांत सुर्वे यांची ऑक्टोबर महिन्यात होणार्या प्रो कबड्डी स्पर्धेच्या धरतीवर बंगाल वॉरियर्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.