कुमारी गटात ज्ञानशक्ती, राजश्री शाहू महाराज अंतिम फेरीत
। भिवंडी । प्रतिनिधी ।
ठाणे जिल्हा कबड्डी असो.ने उजाळा क्रीडा मंडळ-वाळगांव यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 66व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील कुमार गटाच्या अंतिम फेरीत ग्रिफिन जिमखाना(ब) विरुद्ध जय बजरंग एकमेकाला भिडतील. कुमारी गटात ज्ञानशक्ती विरुद्ध राजश्री शाहू महाराज अशी अंतिम लढत होईल. तर पुरुष व्यावसायिक गटात रिकी मंडप, जॉयकुमार युवा, जॉयकुमार अँड कंपनी आणि प्रिन्सकुमार या संघांनी उपांत्य फेरीत धडक दिली. वळगांव-भिवंडी येथील स्व.जाईबाई काशिनाथ पाटील क्रीडानगरित सुरू असलेल्या कुमारांच्या उपांत्य सामन्यात ग्रिफिन जिम.(ब) संघाने 5-5 चढायांच्या डावात नवी मुंबई महानगर पालिकेचा कडवा प्रतिकार 30-29 (6-5)असा मोडून काढत अंतिम फेरीत धडक दिली. कुमारांचा दुसरा उपांत्य सामना देखील अत्यंत चुरशीने खेळला गेला. त्या सामन्यात जय बजरंग संघाने मध्यांतरातील 26-22 अशा 4 गुणांच्या पिछाडीवरून श्री हनुमान सेवा मंडळाला 48-47 असे चकवीत दणक्यात अंतिम फेरी गाठली. कुमारी गटाच्या उपांत्य सामन्यात ज्ञानशक्तीने किल्ले माऊलीचा 44-29 असा पाडाव करीत अंतिम फेरीतील आपला मार्ग मोकळा केला.
द्वितीय श्रेणी(ब) पुरुष गटातील उपांत्य सामन्यात अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात जय बजरंगने मध्यांतरातील 07-11 अशी 4 गुणांची पिछाडी भरून काढत चेरोबाचा प्रतिकार 28-22 असा मोडून काढला. निखिल भोईर, दर्शन पवार, तुषार चौधरी यांनी या विजयात चढाई पकडीचा उत्कृष्ट खेळ केला. अजय म्हात्रे, शुभम म्हात्रे, कनक पाटील चेरोबाकडून उत्तम खेळले. दुसर्या उपांत्य सामन्यात जय हनुमानने हुतात्मा शांतारामला 32-13 असे नमवित अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली. व्यावसायिक पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत रिकी मंडपने हिंदवी प्रतिष्ठाणला 19-18; जॉयकुमार युवाने बर्थ डे बॅशला 31-25; जॉयकुमार अँड कंपनीने रिद्धी-सिद्धी बिल्डरला 33-25 आणि प्रिन्सकुमारने विवेक मनीष आणि खुशालचा 42-35 असा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली.