| श्रीवर्धन | वार्ताहर |
एसएनडीटी महिला विद्यापीठ संचालित महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय, श्रीवर्धनची राष्ट्रीय सेवा योजना समिती, रायगड पोलीस आणि शिवरुद्र अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थिनीसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठगीत तसेच आदर्शाच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सविता गर्जे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दामिनी पथका विषयी माहिती दिली. स्वसंरक्षण शिबिरात शिकविल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिकांपैकी किमान एक तरी प्रात्यक्षिक आपणाला स्वसंरक्षणासाठी आलेच पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना केले. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शिवरुद्र अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष शैलेंद्र ठाकूर यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह शिकविले. विद्यार्थिनींना नाविन्यपूर्ण शिकायला मिळत असल्याने त्यांच्यात एकच उत्साह होता. अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय राणे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले, ते म्हणाले स्वसंरक्षण म्हणजे स्वत:चे रक्षण स्वतःच करणे आणि ते करीत असताना शारीरिक भाषा, आवाजातील चढउतार आणि स्वतःवरचा विश्वासही तितकाच महत्वाचा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक प्रा. तृप्ती विचारे यांनी केले.






