संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानकडून तालुक्यातील कडाव येथील गजानन विद्यालय आणि शिशु मंदिर मधील विद्यार्थ्यांसाठी आनंद वर्गाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थिनींसाठी प्रामुख्याने स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.
कडाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आनंद वर्गासाठी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे आनंद केंद्र समन्वयक कोकण प्रांत शीतल निकम तसेच दादर येथील प्रगती विद्यालयाच्या शिक्षिका आणि आनंद वर्गाच्या विशेष शिक्षिका मानसी शिंदे, नवी मुंबई जिल्हा संयोजिका प्रणाली खत्री, तसेच कुलाबा जिल्हा दुर्गा वाहिनी संयोजिका आभाळ कडू आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला अक्षरी गजानन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. रंजना देशमुख, शिशु मंदिर मुख्याध्यापिका अंजली गुरव यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, तर शाळांमध्ये आनंद वर्गाची आवश्यकता का आहे? याची माहिती आपल्या प्रास्ताविकामधून मुख्याध्यापिका अंजली गुरव यांनी दिली. महिलांवरील अत्याचार, महिलांना आत्मसंरक्षण करता यावे यासाठी लहान वयापासूनच मुलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळायला हवे म्हणून अनेक ठिकाणी असे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर इयत्ता पाचवी ते सातवीमधील विद्यार्थिनींना शीतल निकम आणि आंचल कडू यांनी शालेय मुलींमध्ये धाडसी वृत्ती आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे दिले. समाजात कसे राहायचे, आपली संस्कृती कशी जपायची ही शिकवण दिली. तर, मुलींसाठी मैदानी खेळ याचे विकास स्पष्ट करीत त्यांची माहिती मानसी शिंदे आणि प्रणाली खत्री यांच्याकडून माहिती देतानाच शाळेतील मुलींचेदेखील खेळ घेतले.
मुलांनी मैदानात खेळले पाहिजे त्याशिवाय मुलांचा सर्वांगीण विकास होणार नाही याकडे शिशु मंदिर अधिक लक्ष देईल, असे आश्वासन मुख्याध्यापिका अंजली गुरव यांनी दिले. यावेळी गजानन विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रंजना देशमुख तसेच सत्संग प्रमुख अलका कोशे, कर्जत प्रखंड संयोजिका पुष्पा मोहिते यांनी प्रशिक्षण वर्गात व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.