| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जागतिक महिला दिनानिमित्त अलिबाग पंचायत समितीमधील महिला कर्मचार्यांसाठी शुक्रवारी (दि.10) आत्मसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. अलिबाग पंचायत समिती येथे महिला तक्रार निवारण समितीची सभा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिलांना हे मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात आले.
अलिबाग पंचायत समिती महिला तक्रार निवारण समिती व अँटीकरप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया डिस्ट्रिक्ट रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हे महिलांसाठी आत्मसंरक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
अलिबाग पंचायत समिती महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष तथा अलिबाग पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. मेघा खवसकर यांनी हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. अँटीकरप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे डिस्ट्रिक्ट चीफ इन्चार्ज रुपेश दांडेकर व महिला पोलीस अक्षता रुपेश दांडेकर यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण शिबिरात अलिबाग पंचायत समितीमधील महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्य सचिव तथा ग्रामविकास अधिकारी श्वेता कदम यांनी केले. त्रिशाली सोनवडेकर यांनी आभर प्रदर्शन केले.