। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जागतिक कुस्ती संघटनेकडून निलंबन मागे घेण्यात आल्यानंतर भारतीय कुस्ती संघटनेने विशेष सर्वसाधारण बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून निलंबन मागे न घेण्यात आल्यास सरकारी मदतीशिवाय कुस्ती संघटनेचे कामकाज सुरू राहील, अशी भूमिका याप्रसंगी त्यांच्याकडून घेण्यात आली आहे.
भारतीय कुस्ती संघटनेने निवडणुकीदरम्यान नियम मोडल्याचे कारण पुढे करीत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून त्यांना निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, जागतिक कुस्ती संघटनेकडून त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्यानंतर भारतीय कुस्ती संघटनेकडून विशेष सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले. नॉयडा येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला 25 संलग्न राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सरचिटणीस प्रेम चंद लोचाब यांची मात्र या बैठकीला अनुपस्थिती होती.
भारतीय कुस्ती संघटनेकडून या बैठकीत संविधानात सुधारणा करण्यात आली. त्यानुसार आता एखाद्या व्यक्तीला नव्या पदासाठी निवडणूक लढवायची असल्यास त्याला दोन तृतीयांश मते मिळणे आता गरजेचे नसणार. साध्या बहुमतावरही त्याला विजय मिळवता येणार आहे. मात्र, एकाच पदासाठी त्याला पुन्हा निवडणुकीत उभे राहायचे असल्यास त्याला दोन तृतीयांश मतांची गरज आवश्यक असणार आहे.