चौल येथील श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान

| रेवदंडा | वार्ताहर |

नजिकच्या उत्खननाने चौल-रेवदंडा नव्हे चौल चंपावतीनगरी इतिहास शके 800 ते 1200 कालावधीत जोडला गेल्याचे स्पष्ट केले. पौराणिक व्दापारयुगात चौल-रेवदंडाचा उल्लेख रेवतीनगर असा लिखित आहे. इतिहासकालात विदेश व्यापारांशी संलग्न असलेल्या चौल चंपावतीनगरीत प्रसिध्द अशी 360 मंदिरांची नोंद सापडते. चौल रामेश्वर, चौल शितळादेवी, हिगुंळजा देवी, मुखरी गणपती, महालक्ष्मी, चंपावतीदेवी, चौल कुडेंश्वर मंदिर, रेवदंडा हरेश्वर मंदिर, रेवदंडा मारूती मंदिर आदी मंदिरे अद्यापी इतिहासाची साक्षीदार आहेत, त्यापैकी चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान एक आहे.

चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथे दत्त जयंतीच्या पाच दिवसांचे यात्रेला रायगड जिल्हांसह मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणाहून यात्रेकरू येतात. अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठी व वर्षातील शेवटची यात्रा दत्त जयंती उत्सहात साजरी होते. श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थानाची मिळणारी माहिती अतिशय मनोरंजक अशीच आहे. इ. स. 1810 च्या मार्चॠएप्रिलमध्ये डोंगरावर कोणी एक गोसावी राहत होता. त्यांने तिथे एक मठी बांधली. हा गोसावी दत्ताची भक्ती करीत असे. एक दिवस त्याने दत्ताच्या पादुका पुर्वीच्या जागेवरून काढून त्या आपल्या मठीत आणल्या आणि घागरीखाली पुरून ठेवल्या. पुढे 1831 मार्च-एप्रिलमध्ये एक पाषाणाची दिपमाळा बांधण्यात आली. 1834 च्या डिसेंबर मध्ये गोविंद वाडकर नावाच्या रेवदंडयाच्या कोळी गृहस्थांने पादुकांच्या भोवताली प्रदक्षिणेची साधी असलेली वाट चुनेगच्चीची केली. तर वर कळस बांधला.1843 मध्ये गणेशभट गुजराथी प्रभासकर यांनी भिक्षा मागून पैसे जमविले आणि मठीचा जीर्णोध्दार केला. त्यावर कौलारू मंडप बांधला. या ठिकाणी एक फिरता बैरागी वस्तीस आला. त्यांने 1857 च्या नोव्हेंबरमध्ये दत्ताची एक पाषाण मुर्ती आणली आणि तिची जुन्या पादुकांजवळ स्थापना केली.

श्री दत्तात्रयांची यात्रा मार्गशिष शुध्द पौणिमेला श्री दत्त जयंतीपासून पाच दिवस रात्रंदिवस भरते व या यात्रेत अडीच ते तिन लाख लोक सामील होतात. या यात्रेत लाखो रूपयांची उलाढाला होते. या शिवाय दर गुरूवारी सुध्दा भक्तगण बहुसंख्येने दत्त दर्शनास येतात. तसेच, सहलीला येणारे पर्यटक सुध्दा श्री दत्तात्रयांचे दर्शन घेतात. हा दत्त नवसाला पावतो व त्याच्या दर्शनाने अडीअडचणीचे निवारण होते, अशी लोकांची श्रध्दा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी या नगरीतील पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजापैकी मुंबईत राहणाऱ्या मंडळीनी सुमारे 40 ते 60 वर्षापुर्वी तयार केलेला चांदिचा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून वाजतगाजत तो दत्त मंदिरात आणला जातो. आणि मुळ दत्तमूर्तीची यथासांग पुजा करून हा मुखवटा मुळ दत्तमुर्तीला लावतात. यात्रेपुर्वी या श्री दत्त मंदिरात सात दिवस सप्ताह चालतो. या सप्ताहात आंदोशी गावापासून रामराज पर्यंत साधारणतः 19 गावे सहभाग घेतात. हा सप्ताह रात्रंदिवस यात्रेदरम्यान सुरू असतो.

Exit mobile version