ठाम मतदार हीच शेकापची दौलत- जयंत पाटील

। खोपोली । संतोषी म्हात्रे ।

एक दोन लोक इकडे तिकडे गेले तरी शेतकरी कामगार पक्षाच्या मतांना कोणी हात लावू शकत नाही. याची साक्ष खालापूर आणि खोपोलीकरांनी या मेळाव्याच्या निमित्ताने दाखवून दिली आहे. शेकापचे कार्यकर्ते जर अशाच पद्धतीने एकसंघ राहतील तर भविष्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. कारण ठाम मतदार हीच शेतकरी कामगार पक्षाची दौलत आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. खालापूर तालुका आणि खोपोली शहर कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

खोपोलीसारख्या शहरात उद्योगधंद्याना आवश्यक असलेले कामगार जे वाड्यावस्त्यातून राहतात. त्या कामगारांच्या घरांचे पुनर्वसन झाले पाहिजे. यासाठी आमदार असताना मी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहात आवाज उठवला होता. मात्र दुर्दैवाने त्याला सरकारी यंत्रणेकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. भविष्यात आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यासाठी लढा उभारूया. मी आमदार या नात्याने खोपोली शहरातील आणि खालापूर तालुक्यातील विविध विकास कामांमध्ये योगदान दिले आहे. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अडचणीत असताना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आर्थिक स्वरूपाचे सहकार्य करून संस्थेला पुन:श्‍च ऊर्जा देण्याचे काम केल्याने आज संस्थेचा चेहरा मोहरा बदलला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

खालापूर तालुका आणि खोपोली शहराचा झपाट्याने विकास होत आहे. सध्या स्थितीत असलेले उद्योगधंदे जोमात आहेत. उद्योजक येथे आकर्षले जात आहेत. अशा परिस्थितीत स्थानिकांना रोजगारासाठी संधी मिळावी. कार्यकर्त्यांना कंत्राटे मिळावीत, यासाठी प्रयत्न करावे लागतील. सर्वत्र रहिवासी संकुलाचे निर्माणदेखील प्रगतीपथावर आहे. त्यामध्येदेखील रोजगारांची मोठी संधी आहे. महिला वर्गालादेखील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून वित्त आणि प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याकडे आपण भर देऊया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातदेखील महिलांना प्राधान्य दिले जाईल. राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे महिला संघटनेची पुनर्बांधणी केली जाईल. युवक आणि नवनवीन कार्यकर्त्यांना देखील संघटनात्मक दृष्टीने काम करण्याची संधी जिल्हा चिटणीसांच्या माध्यमातून देण्यात येईल, असे जयंत पाटील म्हणाले.

यावेळी नवनियुक्त रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी आपले विचार मांडले. महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा अ‍ॅड . मानसी म्हात्रे यांनी परखड प्रमाणे प्रतिपादन करत महिला संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे अभिवचन दिले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, युवा नेते अतुल म्हात्रे आणि देवा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याच्या सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र रोकडे, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, युवानेते कैलास गायकवाड, ज्येष्ठ नेते श्याम कांबळे यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले.

Exit mobile version