| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद तसेच अन्य विभागातील अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी प्रतिनियुक्तीवर राज्य सरकारने मंत्रालय, विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये केेलेली आहे. त्यांना पुन्हा मुळ जागेवर पाठविले जावे, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. त्यांनी याबाबतचे पत्रही विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांना पाठविलेले आहे.
रायगडातील अनेक तलाठी यांच्यासह अन्य क्लार्क, अधिकारी हे प्रतिनियुक्तीवर मंत्रालयात कार्यरत असल्याचे दिसून आलेले आहे. यामुळे मुळ नियुक्ती झालेल्या ठिकाणचे काम विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम स्थानिक स्तरावरील जनतेवर होत असल्याची तक्रारही पंडित पाटील यांनी केलेली आहे. आधीच रायगडात कर्मचार्यांची मोठी कमतरता आहे. सरकारकडून नवीन पदभरती केली जात नाही. आहे त्या कर्मचार्यांकडून काम करुन घ्यावे लागत आहे. त्यात पुन्हा अशी प्रतिनियुक्ती करण्यात आली तर त्याचा परिणाम एकूणच सरकारी कामकाजावर होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. यासाठी सरकारने या प्रतिनियुक्ती केलेल्या सर्व कर्मचार्यांना त्यांच्या मुळ नियुक्तीवर पाठवावे, अशी मागणीही त्यांनी केली. या संदर्भात आपण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सुचित केेले.