विद्यमान खासदाराला घरी पाठवा, गद्दार आमदाराला मातीत गाडा

उद्धव ठाकरे यांचे आवाहन

। रायगड । खास प्रतिनिधी ।

लोकसभेच्या विद्यमान खासदाराला पुन्हा घरी पाठवायचे आणि अलिबागच्या आमदाराला मातीत गाडून टाकायचे, अशी दुहेरी जबाबदारी अलिबाग आणि रायगडकरांवर आली आहे. त्यांनी एकजुटीने हे काम करावे आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ठाकरे यांनी खासदार सुनील तटकरे आणि अलिबागच्या आमदाराचे नाव न घेता टीका केली.

यावेळी उपस्थितांनी हात उंचावत गद्दारांना धडा शिकवणार असल्याचा निर्धार केला. अलिबाग-चौल येथे शिवसेनेचा जनसंवाद दौरा पार पडला. जनतेशी संवाद साधताना ठाकरे बोलत होते. या जनसंवाद कार्यक्रमासाठी अलिबाग तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्यांनी आपल्याशी गद्दारी केली आहे. त्यांना आगामी निवडणुकीत आपण धडा शिकवणे गरजेचे आहे. आपल्यासोबत मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उभा राहिला आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रभक्तीचे हिंदुत्व असल्याने देशातील सर्व समाजातील नागरिक आमच्यासोबत असल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपाचे हिंदूत्व हे घर पेटवणारे हिंदूत्व आहे. मात्र, आमचे हिंदूत्व हे सर्वसामान्यांची चूल पेटवणारे असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. या आधीच्या निवडणुकीत भाजपासोबत राहिलो ही आमची चूक होती. गेल्या दहा वर्षात त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली का, याचा जाब नागरिकांनी विचारला पाहिजे, असेही ते म्हणाले.

निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळात नुकसानग्रस्तांना महाविकास आघाडी सरकारने मदत केली होती. केंद्राच्या निकषाबाहेर जाऊन आम्ही जनतेला मदतीचा हात दिला होता, मात्र केंद्र सरकारने किती मदत केली, असा सवालही त्यांनी केला. भाजपाने कोकणच्या वाट्याला विनाशकारी प्रकल्प दिले आहेत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. मात्र, शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी उपस्थित जनतेला दिला. अलिबाग तालुक्यात पर्यटनावर आधारित रोजगार आहे. येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना प्रशासनाच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. त्यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत, हे माजी खासदार अनंत गीते यांनी ठाकरे यांच्या निर्दशनास आणून दिले. जनतेने आता घाबरुन जाण्याचे काम नाही कारण देशात इंडिया आघाडी मजबूत स्थिती तुमच्या पाठीशी उभी आहे, असेही गीते म्हणाले.

विविध यंत्रणेच्या माध्यमातून चौकशा लावून इंडिया आघाडीच्या नेत्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात आलेला निधी आताच्या शिंदे सरकारने रोखला आहे. मात्र, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील आणि संबंधित निधी प्राप्त होईल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, बबन पाटील, प्रकाश जैन यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा अलिबाग तालुक्यातील चौल गावी आयोजित करण्यात आला होता. ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा पेणमार्गे नागाव येथे आला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचेे स्वागत शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, नागाव ग्रामपंचायतीच्या शेकापच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी केले.
अलिबाग-चौल येथील जनसंवाद दौरा आटोपल्यावर उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. याप्रसंगी सचिनदादा धर्माधिकारी, माजी खासदार अनंत गीते, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
Exit mobile version