पुण्याची उपांत्यपूर्व फेरीत धडक
। ठाणे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने तसेच ठाणे जिल्हा कबड्डी असो. ने विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा ठाणे (प.) येथील कॅडबरी कंपनी जवळील भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणार खेळविण्यात येत आहेत. या स्पर्धेत महिलांत गत विजेत्या पुणे ग्रामीणसह मुंबई शहर पश्चिम, पुणे शहर यांनी, तर पुरुषांत पुणे ग्रामीण, मुंबई उपनगर पूर्व, कोल्हापूर यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
चौथ्या दिवशी महिलांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पुणे ग्रामीणने सांगलीला 54-16 असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आक्रमक सुरुवात करीत पुण्याने पूर्वार्धात 3 लोण देत 35-10 अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. दुसर्या सामन्यात मुंबई शहर पश्चिमने गत उपविजेत्या रत्नागिरीचे आव्हान 38-26 असे संपुष्टात आणले. दोन लोण देत मुंबई शहर ने मध्यंतराला 24-12 अशी आघाडी घेतली. नंतर मात्र रत्नागिरीने आपला खेळ उंचावत एका लोणची परतफेड करीत ही आघाडी कमी केली. तिसर्या सामन्यात पुणे शहरने नाशिक शहरला 38-27 असे नमवित उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पुणे ग्रामीणने औरंगाबादला 49-17 असे सहज नमवित आपली घोडदौड पुढे चालू ठेवली. विश्रांतीला 28-08 अशी भक्कम आघाडी घेणार्या पुण्याने नंतर देखील तोच जोश कायम ठेवत सामना एकतर्फी केला. दुसर्या सामन्यात मुंबई उपनगर पूर्वने चुरशीच्या लढतीत रत्नागिरीचा प्रतिकार 36-32 असा संपुष्टात आणला. पहिल्या डावात 18-11 अशी आघाडी घेणार्या उपनगरला दुसर्या डावात रत्नागिरीने शर्थीची लढत दिली. तिसर्या सामन्यात कोल्हापूरने विश्रांतीच्या 13-16 अशा 3 गुणांच्या पिछाडीवरून ठाणे ग्रामीणचा संघर्ष 44-29 असा संपुष्टात आणला.