| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा उरण टाइम्सचे संपादक व कवी धनंजय चिंतामण गोंधळी (85) यांचे शनिवारी (दि.14) वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह ग्रामस्थ व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पंतवंडे असा आप्त परिवार आहे.
धनंजय गोंधळी हे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या सेकंडरी स्कूलचे अनेक वर्ष चेअरमन होते. त्यांना महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झाला होता. कवितेचे सौंदर्य उलगडणाऱ्या गोंधळी यांनी अस्वादक समीक्षेचा वस्तुपाठ प्रस्थापित केला होता. त्यांनी ग्रामीण पत्रकार म्हणून ‘कृषीवल’ या वृत्तपत्रामधून आपल्या लेखनाला सुरुवात केली होती. त्यांनी उरण टाइम्स हे साप्ताहिक सुरू केले होते. एकेकाळी त्यांनी चिरनेर परिसरात शेतकरी कामगार पक्षाची मुहूर्तमेढ रोवून, उरण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा निर्माण केला होता. चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांची शिल्प चित्रे उभी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रभाकर पाटील, सुलभा काकू, दत्ता पाटील, दि.बा. पाटील, दत्तूशेठ पाटील, मीनाक्षी पाटील यांच्यासह शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, विवेक पाटील, बाळाराम पाटील, सुप्रिया पाटील यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.







