। चणेरा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेच्या विश्वावर शोककळा पसरली आहे. रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, साप्ताहिक रोहा टाइम्स तसेच टीव्ही सेवन मराठी न्यूज यूट्यूब चॅनलचे संपादक, निर्भीड व लढवय्ये जेष्ठ पत्रकार मनोज अनंतराव घोसाळकर (50) यांचे मंगळवार, 29 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले.
गेल्या एक वर्षापासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण पत्रकार बांधव आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक रायगड टाइम्स मधून पत्रकारितेची कारकीर्द सुरू करणाऱ्या मनोज घोसाळकर यांनी अल्पावधीतच धडाडीचे, रोखठोक आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे पत्रकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ग्रामीण भागातून पुढे येत त्यांनी पत्रकारितेला सामाजिक भानाची जोड दिली. रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांच्या हितासाठी तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले. रोहा तालुक्यात नवमाध्यम पत्रकारितेला चालना देत त्यांनी टीव्ही सेवन मराठी न्यूज हे यूट्यूब न्यूज चॅनल सुरू करून स्थानिक बातम्यांना नवी दिशा दिली. रोखठोक मांडणी, हसतमुख स्वभाव, दिलदारपणा आणि सर्वसामान्यांशी असलेली आपुलकी यामुळे ते सर्व स्तरांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली जाण्याने पत्रकारितेतील एक निर्भीड दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहीण व भाची असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी 7 फेब्रुवारी, तर उत्तरकार्य 10 फेब्रुवारी रोजी रोहा तालुक्यातील घोसाळे येथे होतील. मनोज घोसाळकर यांच्या निधनाने रायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेचा एक प्रामाणिक आणि संघर्षशील आवाज कायमचा शांत झाला आहे.







