सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु
। सोलापूर । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी दिली. सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. गणपतराव देशमुखांनी वयाची 96 वर्षे पूर्ण केली आहेत. इतके वय असूनही ते आतापर्यंत मतदारसंघात फिरत होते. जनसामान्यांचे प्रश्न तडीस लावून नेत होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पित्ताशयात खडे आहेत. यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले आहे.
आमदार गणपतराव देशमुख हे सलग 54 वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे. 1962 ते 1995 पर्यंत ते सलग आमदार म्हणून निवडून आले.
रोजगार हमी मंत्री असताना गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबासारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकर्यांना प्रोत्साहान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज सांगोल्याची डाळिंब उत्पादनात देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाटा वाटा आहे. देशातील महिलांसाठीची पहिली सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली. पाणी, रोजगार आणि शेती या क्षेत्राशी त्यांचा मोठा व्यासंग आहे.-.