महाराष्ट्राची धुरा असलम इनामदारच्या खांद्यावर
| अहमदनगर । वार्ताहर |
अहमदनगर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे (दि.21) मार्च पासून होणार्या 70 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने बारा जणांचा चमू जाहीर केला. ठाण्याच्या असलम इनामदार याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून नाशिकचा आकाश शिंदे या संघाच्या उप संघनायक असेल. अहमदनगर येथे डिसेबर 2022 साली झालेल्या 70 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून तसेच नुकत्याच ठाणे येथे झालेल्या 22 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेतून हा 29 जणांचा संघ निवडण्यात आला. नगर येथे या सर्व निवडलेल्या खेळाडूंचा सराव शिबीर घेण्यात येऊन त्यातून अखेर आज 12 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. निवडण्यात आलेल्या या संघात विजेत्या मुंबई शहर आणि उपविजेत्या अहमदनगर संघाचे प्रत्येकी 3-3 खेळाडू असून ठाणे, नाशिक, रायगड, नांदेड, मुं. उपनगर, रत्नागिरी या जिल्ह्याचे प्रत्येकी 1-1 खेळाडू निवडले गेले आहेत.
हरियाणा येथील चरखी – दादरी येथे झालेल्या 69 व्या वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ भारतीय रेल्वेकडून पराभूत झाल्याने उपविजेता ठरला होता. तर जानेवारी 2019 साली रोहा, रायगड येथे झालेल्या 66 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने तृतीय क्रमांक प्राप्त केले होते. अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू शांताराम जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनात हा संघ जेतेपद मिळविण्याच्या इराद्याने या स्पर्धेत उतरणार आहे. संघ निवड कागदावर तरी समतोल दिसत आहे. प्रत्यक्षात मैदानावर तो संघ कसा खेळतो यावर सर्व काही अवलंबून आहे. वरिष्ठ पुरुष संघामध्ये असलम इनामदार-संघनायक (ठाणे), आकाश शिंदे-उपसंघनायक (नाशिक), संकेत सावंत (मुंबई शहर), आदित्य शिंदे (अहमदनगर), मयूर कदम (रायगड), हर्ष लाड(मुंबई शहर), शंकर गदई(अहमदनगर), किरण मगर(नांदेड), अरकम शेख (मुंबई उपनगर), प्रणय राणे (मुंबई शहर), ओमकार कुंभार (रत्नागिरी), शुभम राऊत (अहमदनगर) यांचा समावेश आहे. मुख्यप्रशिक्षक म्हणून शांताराम जाधव. सहा. प्रशिक्षक म्हणून दादासो आवाड आणि व्यवस्थापक म्हणून शंतनु पांडव यांची निवड करण्यात आली.