| अहमदनगर | वृत्तसंस्था |
हरियाणाने ’70व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेत भारतीय रेल्वेचा कडवा प्रतिकार 35-30 असा मोडून काढत विजेतेपद मिळविले. दरभंगा-बिहार येथे झालेल्या ’51व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत’ हरियाणाने बँक स्पोर्टस् बोर्डला नमवित पहिल्यांदा विजेतेपद मिळविले होते. नंतर त्यांना मुंबई-महाराष्ट्रात (2012) रेल्वे कडून, पटणा-बिहार येथे (2014) राजस्थानकडून, तर जोधपूर-राजस्थान येथे (2016-17) सेनादलकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते. तर 2022 साली यजमान पद लाभलेल्या ’69व्या राष्ट्रीय स्पर्धेत’ हरियाणाला उपांत्य फेरीत महाराष्ट्राकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय रेल्वे या अगोदर सलग 4वेळा विजेते होते.
अहमदनगर, वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मॅटवर झालेला अंतिम सामना पाहण्याकरीता नगरकरांनी तुफान गर्दी केली होती. पंकज मोहितेने आपल्या पहिल्याच चढाईत गुण घेत रेल्वेचे खाते उघडले. पण 10व्या मिनिटाला 9-6 अशी आघाडी हरियाणाकडे होती. 12व्या मिनिटाला 9-9, तर 15व्या मिनिटाला 11-11 अशी पुन्हा बरोबरी झाली. 18व्या मिनिटाला पंकजने हरियाणाचे शिलकी 2 गडी टिपत हरियाणावर पहिला लोण देत रेल्वेला 17-13 असे आघाडीवर नेले. सामना विश्रांतीला थांबला तेव्हा 18-15अशी रेल्वेकडे आघाडी होती. शेवटची 5मिनिटे पुकारली तेव्हा रेल्वेकडे 27-24 अशी आघाडी होती. शेवटची 1-2 मिनिटे असताना हरियाणाच्या आशू मलिकने शिलकी 2 गडी टिपत रेल्वेवर लोण देत 31-30 अशी आघाडी घेतली. शेवटी 5 गुणांनी ’70व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेचा चांदीचा चषक उंचाविला.
हरियाणाच्या या विजयात आशू मलिकने 1 बोनस व 12 गुण असे 13 गुण घेत महत्वाची भूमिका बजावली. मोहित गोयतने 2 गुण, 2 पकडीचे आणि एक अव्वल पकड करीत 2गुण असे 6गुण घेत त्याला योग्य साथ दिली. क्रिशनने 4, तर जयदीपने 2 पकडी करीत बचावाची बाजू उत्तम सांभाळली. भारतीय रेल्वेकडून पंकज मोहीतेने 1 बोनस व 6 गुण असे 7 गुण मिळविले. एम. सुधाकरने 5 गुण घेत त्याला छान साथ दिली. सूरेंदर गिल, नितेश कुमार, परवेज भैस्वावाल यांनी प्रत्येकी 3-3 पकडीत गुण घेतले. तरी देखील रेल्वेला पाचव्यांदा जेतेपद राखण्यात अपयश आले. चंदीगडला पहिल्यांदाच उपांत्य फेरीत घेऊन जाणार्या पवन शेरावतची उणीव रेल्वेला भासली असेल. स्पर्धेचे बक्षीस वितरण हॉकीचे आंतर राष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्ले, शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत पार पडले. हरियाणाने अंतिम विजेतेपद मिळविल्याने महाराष्ट्राच्या खेळाडूंना व क्रीडा रसिकांना कुठे ना कुठे तरी चुटपुट लागून राहिली असेल. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राला 38-37 असे, तर भारतीय रेल्वेने चंदीगडला 5-5 चढायांच्या डावात 43-41 असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. बाद फेरीपासूनचे सर्वच सामने चुरशीने खेळले गेले. त्यामुळे तुफान गर्दी करून सामने पहाण्यासाठी आलेल्या सर्व नगरकर क्रीडा प्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटले असेल. पहिल्या दिवसापासून सर्वच सामने दिलेल्या वेळेवर सुरू करण्यात आयोजन समिती जवळजवळ यशस्वी झाली असे म्हणावे लागेल.