खळबळजनक! सरकारी वकिलास लाच घेताना अटक

| पेण | वार्ताहर |

पेण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकरी न्यायालयातील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्क्ता ॲड. दिनेश जनार्दन पाटील यांस दहा हजार रुपयांची लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

या मधील तक्रारदार व त्यांचा मित्र यांच्या विरोधात पेण पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोप पत्र या न्यायालयात दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदार आणि त्यांचा मित्र यांनी न्यायालयात डिस्चार्ज अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावरील सरकारी अभियोक्ता यांचे म्हणणे सादर केल्याबाबत व त्याकरिता मदत करण्याकरिता, तसेच तक्रारदार यांनी मोबाईल सीडीआर, एसडीआर व टॉवर लोकेशनचा अहवाल मिळण्यासाठी केलेल्या अर्जात मदत देण्याकरिता तसेच आरोपी विरोधात ठोस युक्तिवाद न करण्याकरिता प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपयांची मागणी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. दिनेश जनार्दन पाटील यांने केली असल्याची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 3 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. या तक्रारीच्या पडताळणी करताना, तक्रारदार यांच्या कडून दहा हजार रुपये लाचेची मागणी करून, लाचेची रक्कम ॲड. दिनेश जनार्दन पाटील हा न्यायालयात स्वीकारणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी (दि. 4) पेण न्यायालयात सापळा रचून, तक्रारदार यांच्याकडून मागणी केल्याप्रमाणे दहा हजार रुपये स्वीकारताना ॲड. दिनेश जनार्दन पाटील यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, पोलीस उपअधीक्षक नितीन प्रभाकर दळवी यांच्या मार्गदर्शनाने सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या नेतृत्व- खालील पो. नि. संतोष पाटील, स. पो. फौ. जाधव, पो.ना. अहिरे म.पो.ना. बासरे, मपोना विश्वा- सराव चालक पो. हवा. गायकवाड या पथकाने ही कारवाई केली आहे.

Exit mobile version